पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – निगडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटल्यात आले. ‘मी इथला भाई आहे’ अशी आरडाओरड करून आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास संजय काळे मैदानाजवळ घडली.
योगेश राम मानकेश्वर (वय २४, रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचा साथीदार आकाश धुमाळ (वय २८, रा. देहूगाव) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश रामचंद्र जाधव (वय १९, रा. पंचतारानगर, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश हे निगडी येथील संजय काळे मैदानाजवळ ग्राहकांच्या गाड्यांना नंबरप्लेट बसवण्याचे काम करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. नकार दिला असता आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपीने हातातील काठी उगारून “मी तडीपार होतो, हे तुला माहीत नाही का?” असे धमकावत परिसरात दहशत माजवली. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तळे करत आहेत.
निगडीत टोळक्याचा राडा; नंबरप्लेट बसवणाऱ्या तरुणाला मारहाण
