साडेअकरा लाखांचे मेफेड्रोन जप्त; तीन तस्करांना अटक

​पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खालुंब्रे येथे कारवाई करून ११ लाख ६५ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २२ एप्रिल) रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
​याप्रकरणी पोलीस हवालदार विजय दौंडकर यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिशुपाल धनाराम चौधरी (वय २५), रामदिन भवरलाल चौधरी (वय २४) आणि प्रविण मल्लाराम चौधरी (वय २२, तिघेही रा. राजस्‍थान) यांना अटक केली आहे. तर मांगीलाल चौधरी व नरेश चौधरी यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पोलीस त्‍यांचा शोध घेत आहेत.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिशुपाल आणि रामदिन हे खालुंब्रे येथील सार्वजनिक रस्त्यावर मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून ११ लाख ६५ हजार ४०० रुपये किंमतीचे ११६ ग्रॅम ५४ मिलीग्रॅम मेफेड्रोन, एक मोटारसायकल, तीन मोबाईल आणि वजनकाटा असा एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *