पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल; भ्रष्टाचार प्रकरणांची तपासणी करण्याच्या विभागीय आयुक्तांना सूचना
लोणावळा(pimpri chinchwad) : पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची जाणीव शासनाला व्हावी याकरिता एक मे या महाराष्ट्र दिनी स्वतःच्या मालकी जागेमध्ये लावण्यात आलेल्या एक लाख झाडे तोडण्याची परवानगी द्या अशा स्वरूपाचे पत्र भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना 22 एप्रिल रोजी दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांना या पत्राची त्वरित दखल घेत स्वतः तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रकाश पोरवाल हे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून लोणावळा शहर मावळ तालुका व पुणे जिल्ह्यामध्ये काम करतात. मागील काही काळापासून ते भारतीय जनता पार्टी उद्योगाकडे चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी समोर आणला असून काही प्रकरणांमध्ये त्यामधून शासनाला फायदा देखील झाला आहे. मात्र तरीदेखील शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार सुरू असल्याच्या प्रकाश पोरवाल यांच्या तक्रारी आहेत.
या प्रकरणांचा पाठपुरावा करत असल्यामुळे शासकीय अधिकारी ज्यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख व इतर दुय्यम अधिकारी यांनी खाजगी व्यक्तींना हाताशी धरत प्रकाश पोरवाल यांच्या लोणावळा येथील घरावर कारवाई केली आहे तसेच येथील नकाशांमध्ये बदल करण्यात आले आहेत घराची व परिसराची कागदपत्रे शासकीय कार्यालयांमधून गायब करण्यात आले आहेत असे अनेक आरोप प्रकाश पोरवल यांनी त्यांच्या पत्रांमध्ये केले आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी न्यायालयामध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करत माझ्या घराकडे जाणारा रस्ता हा मी अतिक्रमण करून बनवला असल्याचे म्हटले होते. या खोट्या प्रतिज्ञापत्रावरून माझा घराकडे जाण्याचा रस्ता तोडण्यात आला असून तीस लाख रुपये दंड करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांचे या खोटेपणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी असे प्रकाश पोरवाल यांनी म्हटले आहे.
याबाबतची माहिती त्यांनी महसूलमंत्र्यांना लेखी निवेदनाद्वारे देत जर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार व गैर व्यवहार थांबत नसतील तर या गंभीर गोष्टींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये लावण्यात आलेली एक लाख झाडे मी महाराष्ट्र दिनी तोडत आहे त्याकरता मला परवानगी मिळावी असे म्हटले होते. पोरवाल यांच्या या अर्जाची महसूलमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून पुणे विभागीय आयुक्त यांना या प्रकरणी स्वतः तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
