पिंपरी – पीसीएमसी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित चौदा वर्षाखालील ‘व्हेरॉक कप’ स्पर्धेत ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमीने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीवर मात केली. सामन्यातील खेळाडूंच्या अचूक फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीने प्रेक्षकांची दाद मिळवली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. यावेळी लेमन ट्री हॉटेल इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर शाम शर्मा यांचीही उपस्थिती होती.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना वेंगसरकर यांनी फलंदाजांना महत्त्वाचे मंत्र दिले. धावांचा पाठलाग करताना योग्य फटक्यांची निवड आणि पायांची हालचाल अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्य आणि सरावातूनच यश मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
ट्रिनीटीच्या विजयात गुरू राजोळे याने चमकदार कामगिरी केली. त्याला ‘सामनावीर’ आणि ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ असे दुहेरी सन्मान मिळाले. याशिवाय यशवर्धन आजबे याला उत्कृष्ट फलंदाज, वेदांत खेळगी याला उत्कृष्ट गोलंदाज तर द्विजेश ढवळे याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्याला प्रशिक्षक मोहन जाधव, राहुल वेंगसरकर, शादाब शेख, चंदन गंगावणे, प्रमोद लिमण आणि भूषण सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील यांनी केले.
तरुण खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्दी आणि कौशल्यामुळे स्पर्धेला वेगळी उंची मिळाली. भविष्यातील क्रिकेटपटू घडवण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
