मोबाइल चार्जिंगवरून वाद; मित्राला दगडावर ढकलले

​पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जिंगवरून झालेल्या वादातून एका तरुणाला इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्‍या दगडांवर ढकलून देऊन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्‍यातील निघोजे येथे गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी मध्‍यरात्री सव्‍वाबारा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​युवराज जोशी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. गणेशकुमार राजकुमार केवट (वय ३४, रा. निघोजे, मूळ रा. मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव असून त्‍यांनी याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे इंद्रायणी नदीच्या जुन्या पुलाजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. आरोपीने आपला मोबाईल फिर्यादीचा मित्र मुकेश याच्याकडे चार्जिंगला दिला होता. मुकेश तो वेळेवर घेऊन न आल्याने चिडलेल्या आरोपीने फिर्यादीशी वाद घातला आणि शिवीगाळ करत त्यांना नदीच्या किनारी दगडांवर ढकलून दिले. यात फिर्यादीच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. म्हाळुंगे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *