मुख्यमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल; नक्षलवादाचे समर्थन केल्याचा आरोप, सहा दिवसांची पोलीस कोठडी
पिंपरी-चिंचवड – सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोशल मीडिया विभागाचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरासह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी महादेव बालगुडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केला. यामुळे सार्वजनिक भावना भडकण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारा मजकूरही त्यांनी शेअर केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी एका वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलीसांनी आरोपीला बारामती येथून ताब्यात घेतले.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कालावधीत आरोपीने वापरलेली मोबाईल, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक साधनांची तपासणी केली जाणार आहे. सोशल मीडिया खात्यांची सखोल छाननीही सुरू आहे.
या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तपासाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे सोशल मीडियावरील जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आक्षेपार्ह मजकूर किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृतींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीसांनी दिला आहे.
