६,९४५ चौ.मी. बांधकामांवर हातोडा; ३३ पत्रा शेड हटवले, प्रशासनाचा कडक इशारा
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई केली. जगताप डेअरी ते वाकड या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारलेल्या अतिक्रमणांवर आज सकाळी व्यापक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ६ हजार ९४५ चौ. मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटवण्यात आले. तसेच ३३ पत्रा शेड निष्कासित करण्यात आले.
या मोहिमेसाठी एकूण १०४ मालमत्तांची यादी तयार करण्यात आली होती. न्यायालयीन स्थगिती असलेल्या मालमत्ता वगळता उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार झाली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात पथकाने ही मोहीम राबवली.
कारवाईदरम्यान १५० अधिकारी-कर्मचारी, १०४ पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ६० जवान तैनात होते. १६ जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाची गाडी आणि ॲम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली होती.
महापालिकेने स्पष्ट केले की, शहराचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत विकास साधण्यासाठी अनधिकृत बांधकामांना आळा घालणे अत्यावश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई अटळ आहे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
महापालिकेची ही धडक मोहीम पुढील काही दिवसही सुरू राहणार असून, अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
