दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी पिंपरी पालिकेचा मास्टरप्लॅन; ‘मिशन संधी आरंभ’चा उद्यापासून श्रीगणेशा!

​कॉर्पोरेट कंपन्यांसोबत उभी राहणार शाश्वत रोजगार परिसंस्था; वाकडमध्ये रंगणार वैचारिक मंथन

​पिंपरी-चिंचवड ः
पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, यासाठी महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशनने कंबर कसली आहे. याअंतर्गत ‘मिशन संधी आरंभ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात उद्या सोमवार, दि. ४ मे रोजी वाकड येथील हॉटेल सयाजी येथे होत आहे. दिव्यांगांसाठी स्वयंपूर्ण आणि शाश्वत ‘एम्प्लॉयर इकोसिस्टम’ उभारण्याच्या उद्देशाने ही वर्षभर चालणारी मोहीम राबवली जाणार आहे.

​काय आहे ‘मिशन संधी आरंभ’?
हा उपक्रम केवळ चर्चासत्रापुरता मर्यादित नसून, याद्वारे कॉर्पोरेट क्षेत्र आणि दिव्यांग समाज यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, एचआर (HR), सीएसआर (CSR) प्रमुख, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय अधिकारी एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या प्रत्येक संस्थेकडून दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी प्रत्यक्ष मदतीची औपचारिक प्रतिज्ञा (Pledge) घेतली जाणार आहे.

प्रमुख मोहिमांचे स्वरूप:
​मिशन संधी: कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग वाढवून त्यांना समावेशकतेची प्रतिज्ञा देण्यास प्रवृत्त करणे.
​संधी सक्षम: लायझन ऑफिसर प्रशिक्षण आणि ‘इक्वल ऑपर्च्युनिटी पॉलिसी’ राबविणे.
​संधी मेळा: दिव्यांग उमेदवार आणि कंपन्या यांच्यात दर तीन महिन्यांनी थेट संवाद घडवून आणण्यासाठी विशेष मेळावे.

​तज्ज्ञ संस्थांचे पाठबळ
या उपक्रमासाठी बेंगळुरू येथील ‘इन्क्लुझ्झा’ ही संस्था नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत असून, ‘रोहिणी पीपल टेक्नॉलॉजी’ ही संस्था अंमलबजावणीसाठी (Implementation Partner) सहकार्य करत आहे. या माध्यमातून दिव्यांगांना केवळ नोकरीच नाही, तर इंटर्नशिप आणि लीडरशिप स्तरावरही संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

“दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून ती आपल्या विकासाचा अविभाज्य भाग आहे. ‘मिशन संधी’च्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्र आणि दिव्यांग यांच्यातील दरी कमी करून त्यांना रोजगार, कौशल्य आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा ठाम प्रयत्न आहे. समावेशक आणि सक्षम शहर घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

​”प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळेल असे शहर उभारण्याचा आमचा संकल्प आहे. ‘मिशन संधी’ हा उपक्रम समावेशक रोजगाराच्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा असून, याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यास निश्चितच गती मिळेल.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

​”मिशन संधी आरंभ’ हा उपक्रम सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. या उपक्रमातून प्राप्त झालेल्या बांधिलकीचे रूपांतर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधींमध्ये करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, दिव्यांग सक्षमीकरणासाठी ठोस आणि परिणामकारक काम करण्यावर आमचा भर राहील.”
– ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, दिव्यांग भवन फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *