नवले पुलावर भीषण विचित्र अपघात; दोन कंटेनरच्या दरम्यान पिकअप चिरडली, चालकाचा जागीच मृत्यू

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. दोन भरधाव कंटेनरच्या मध्ये पिकअप गाडी चिरडली गेल्याने पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. महामार्गावरून जात असताना एका कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचे मोठे नुकसान झाले. मात्र, हा अपघात एवढ्यावरच थांबला नाही. या पिकअपच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका भरधाव कंटेनरने पिकअपला पाठीमागून जोरात धडक दिली.
दोन मोठ्या कंटेनरच्या मध्ये ही पिकअप अक्षरशः चेपली गेली. यात पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून चालक आतमध्ये अडकून पडला होता.
मृत व जखमींची माहिती
या दुर्दैवी घटनेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मयत: महादेव उत्तम शेंडे (वय २२, रा. इंदापूर)
जखमी: सुमित दत्तू कांबळे (वय २२, रा. इंदापूर)
जखमी सुमित कांबळे याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतर तब्बल तासाभरानंतर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने पूर्वपदावर आली.
नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेगावर नियंत्रण नसणे आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे या ठिकाणी वारंवार निष्पाप लोकांचा बळी जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *