पुणे : नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असतानाच, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सादर झालेल्या रिमांड अहवालात तपासासाठी महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या असून, आरोपीची वैद्यकीय तपासणी, सक्षमता चाचणी आणि केमिकल अॅनालिसिस (C.A.) तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तपास यंत्रणेनुसार, आरोपी गुन्हा करताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होता का, याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यामुळे सक्षमता चाचणीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तसेच, गुन्ह्याशी संबंधित जैविक व इतर पुरावे गोळा करण्यासाठी C.A. तपासणीसाठी नमुने घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
रिमांड अहवालात नमूद केल्याप्रमाणे, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून बालकावरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. आरोपी आणि पीडित मुलगी यांच्यात यापूर्वी संपर्क होता का, आरोपीने तिला इतर ठिकाणी नेले होते का, तसेच याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याशिवाय, आरोपी पीडितेला घेऊन जात असताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोधणे, त्यांची चौकशी करणे आणि आरोपीने हल्ला करताना कोणत्या प्रकारचे साधन वापरले, याचा शोध घेणेही तपासाचा भाग असणार आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीने कुठे आश्रय घेतला, त्याला कोणाची मदत मिळाली का, याचाही तपास करण्यात येणार आहे.
या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीस २ मे २०२६ पासून ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने आरोपीला कडक बंदोबस्तात हजर करण्यात आल्याची नोंद घेतली.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात काही त्रुटी असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली असून, त्यामुळे पीडितेला न्याय मिळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मात्र तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, सर्व पुरावे आणि तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण : आरोपीच्या सक्षमता व C.A. चाचणीचे आदेश, तपासासाठी ७ दिवसांची कोठडी मागणी
