पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – एका अज्ञात सायबर चोरट्याने तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ९०० रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पीडित व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर आलेला संशयास्पद कॉल स्वीकारला नसतानाही ही चोरी झाली आहे. या चोरीसाठी सायबर चोरट्यांनी लिंक पाठविली नाही किंवा ओटीपीही विचारलेला नाही. ही घटना २१ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान घडली.
याबाबत एका पुरूष फिर्यादीने मंगळवारी (दि. ५ मे) रोजी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:१९ च्या सुमारास आपल्या घरी असताना त्यांना एका अनोळखी व्हॉट्सअॅप नंबरवरून (९८३४५३१५९० वर ७००२५०९८७३ वरून) कॉल आला. फिर्यादी यांनी तो कॉल रिसिव्ह केला नाही. मात्र, त्यानंतर रात्री ११:४९ आणि ११:५० च्या सुमारास त्यांच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून अनुक्रमे ९४ हजार रुपये आणि तीन हजार ९०० रुपये अशा एकूण ९७ हजार ९०० रुपयांचे व्यवहार झाले. हे पैसे एका अज्ञात यूपीआय आयडीवर (८०१७४००४६७-@ibl) वर्ग झाले आहेत. या व्यवहारांबाबत फिर्यादी यांना कोणताही मेसेज प्राप्त झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी यांना आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील निरीक्षक (गुन्हे) कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ना ओटीपी, ना लिंक, तरीही बँक खात्यातून पैसे लंपास
