रक्षकच बनला भक्षक! भोसरीत तीन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाचा अत्याचाराचा प्रयत्न

चिमुरडीच्या धाडसामुळे नराधमाला बेड्या

​पाण्याच्या टाकीचे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले; पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षकाचे संतापजनक कृत्य

​पिंपरी-चिंचवड ः
पिंपरी-चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नराधम सुरक्षा रक्षकानेच माणुसकीला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. एका १० वर्षांच्या मुलीने वेळीच दाखवलेल्या धैर्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि आरोपी गजाआड झाला.
​सातव्या मजल्यावर नेऊन अश्लील चाळे
​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली. दिनेश चौधरी (वय २५) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. त्याने ६ ते १० वर्षे वयोगटातील चार मुलींना ‘तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो’ असे आमिष दाखवले. तो या मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने त्यांच्याशी अश्लील चाळे करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
​’मारून टाकेन’ अशी दिली धमकी
​हे अघोरी कृत्य केल्यानंतर आरोपीने मुलींना प्रचंड घाबरवले होते. “हा प्रकार कोणाला सांगितला, तर मारून टाकेन,” अशी धमकी त्याने चिमुरड्यांना दिली. या भीतीमुळे मुली धास्तावल्या होत्या. मात्र, १० वर्षांच्या धाडसी मुलीने न घाबरता ही बाब आपल्या आईला सांगितली. पालकांनी विलंब न लावता पोलिसांत धाव घेतल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.

​कामाच्या पहिल्याच दिवशी कुकृत्य
​या प्रकरणावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी माहिती दिली. आरोपी दिनेश चौधरी याचा त्या सोसायटीतील कामाचा तो पहिलाच दिवस होता. यापूर्वी त्याने एका एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून या नराधमाला बेड्या ठोकल्या.

पालकांमध्ये तीव्र संताप
​ज्यांच्या भरवशावर मुले सोसायट्यांमध्ये खेळतात, तोच रक्षक भक्षक निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा नराधमांना कडक शासन करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. ​पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *