एलईडी आणि मॉडिफाईड हेडलाईटचा वाढता वापर; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांचा धोका वाढला
पिंपरी-चिंचवड ः
पिंपरी-चिंचवड शहरात रात्री वाहन चालवणे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. वाहनांवर बसवण्यात येणारे अतिप्रखर एलईडी दिवे आणि नियमबाह्य मॉडिफाईड हेडलाईटमुळे चालकांचे डोळे दिपत आहेत. त्यामुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि महामार्गांवर रात्रीच्या वेळी या प्रखर दिव्यांचा त्रास अधिक जाणवतो. हिंजवडी, वाकड, भोसरी, पिंपरी, निगडी आणि ताथवडे परिसरात अनेक वाहनांवर उच्च क्षमतेचे एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. काही वाहनचालक फॅशनसाठी तर काही अधिक प्रकाशासाठी कंपनीच्या मूळ हेडलाईटमध्ये बदल करत आहेत.
समोरून येणाऱ्या वाहनाचा हाय बीम सुरू असताना काही सेकंद रस्ताच दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डोळ्यांसमोर अचानक अंधारी येते. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण होतो. अनेक किरकोळ अपघात याच कारणामुळे होत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, अतिप्रखर दिव्यांमुळे ‘ग्लेअर इफेक्ट’ निर्माण होतो. या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्यांवर ताण येतो. काही क्षण चालकाला समोरील रस्ता दिसेनासा होतो. सतत अशा प्रकाशाच्या संपर्कात राहिल्यास डोळ्यांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
नियमांनुसार वाहन उत्पादकांनी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त क्षमतेचे दिवे वापरणे बेकायदेशीर आहे. एका बल्बची प्रकाश तीव्रता साधारण ३००० लुमेन्सपर्यंत मर्यादित असावी. ५५ ते ६० वॅट क्षमतेचे दिवे मान्य आहेत. तसेच ६५०० के पेक्षा जास्त निळसर प्रकाश देणारे दिवे नियमांचे उल्लंघन मानले जाते. मात्र, शहरात या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
वाहनांच्या मूळ वायरिंगमध्ये बदल करून अधिक क्षमतेचे दिवे बसवले जात आहेत. काही गॅरेजमध्ये अशा मॉडिफिकेशनला खुलेआम प्रोत्साहन दिले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
“रात्री समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश इतका तीव्र असतो की रस्ता कुठे आहे हेच समजत नाही. अनेकदा गाडी थांबवण्याची वेळ येते,” अशी प्रतिक्रिया एका दुचाकीस्वाराने व्यक्त केली.
नागरिकांकडून आता वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने विशेष मोहीम राबवण्याची मागणी होत आहे. नियमबाह्य एलईडी दिवे वापरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, दंड आकारावा आणि संबंधित गॅरेजवरही कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
शहरात स्मार्ट रस्त्यांचे जाळे वाढत असताना वाहनांच्या प्रखर दिव्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
