नवी दिल्ली : भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय मुक्त व्यापार करारासाठी अधिकृत वाटाघाटींना सोमवारी प्रारंभ झाला. दोन्ही देशांदरम्यान सुरू झालेली ही पहिली फेरी २९ जून ते ७ जुलैदरम्यान आभासी माध्यमातून पार पडणार आहे.
भारताच्या वाणिज्य विभागाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत सरकारने मालदीव प्रजासत्ताकासोबत मुक्त व्यापार करारासाठीच्या चर्चेची पहिली फेरी अधिकृतपणे सुरू केली आहे. या वाटाघाटींमध्ये व्यापारवाढ, गुंतवणूक, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण, सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करणे तसेच परस्पर आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
या करारामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील व्यापाराला चालना मिळण्याबरोबरच दोन्ही देशांतील उद्योग, गुंतवणूक आणि आर्थिक संबंध अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच विविध क्षेत्रांतील सहकार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
भारत आणि मालदीव यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
