महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिक्षण सक्तीचे; नियम न पाळणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा

मुंबई : मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्यपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. त्यांनी सांगितले की, मराठी भाषेचे शिक्षण सक्तीने राबविले जात आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविण्यात येणार आहे.

तपासादरम्यान एखादी शाळा मराठी विषयाचे अनिवार्य शिक्षण देत नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री भुसे यांनी दिला.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकण्याची संधी मिळावी आणि मराठी भाषेचा प्रसार अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *