वाइन शॉप बाहेर दोघांवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – वाइन शॉपमधून दारूचे पार्सल घेऊन बाहेर येत असताना रस्ता मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. १० मे) रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास विशाल वाइन शॉप, माण येथे घडली.
याबाबत सचिन गोवर्धन सुर्वे (वय ३८, रा. माण, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष साळवे आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आणि त्यांचा मित्र अनिल गायकवाड वाईन शॉपबाहेर येत असताना वाटेत आरोपी संतोष साळवे आणि त्याचे मित्र उभे होते. सचिन यांनी त्यांना “मला बाहेर जायचे आहे, जागा द्या” असे म्हटल्याचा आरोपींना राग आला. यावरून त्यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर संतोष साळवे याने आपल्याकडील टेस्टर्स स्क्रू-ड्रायव्हरने सचिन यांच्या डोक्यात आणि तोंडावर मारून जखमी केले, तसेच मित्र अनिलच्या डोक्यातही वार केला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *