(Pimpri chinchwad)-आरएमसी प्लांटच्या धुळीमुळे पिंपरी-चिंचवडकरांचा श्वास कोंडला*
*गृहनिर्माण संस्था महासंघाची जनसुनावणीची मागणी*
पिंपरी-चिंचवड ः*
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः निवासी भागातील आरएमसी (Ready Mix Concrete) प्लांटच्या मनमानी कारभाराविरुद्ध पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाने (PCCHSF) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक प्रशासनाला पत्र लिहून कडक नियमावली (SOP) तयार करण्याची आणि तातडीने ‘जनसुनावणी’ घेण्याची मागणी केली आहे.
शहरातील वाकड, पुनावळे, ताथवडे, किवळे आणि रावेत यांसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आरएमसी प्लँट्समधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर विकार जडत आहेत. सध्या या प्लँट्सवर प्रशासनाचे कोणतेही कडक नियंत्रण नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप महासंघाचे सचिव सचिन लोंढे यांनी केला आहे.
*महासंघाच्या प्रमुख मागण्या:*
*धुळीमुक्त तंत्रज्ञान:* आरएमसी प्लांट पूर्णपणे ‘डस्ट-फ्री’ असणे अनिवार्य करावे.
सेडिमेंटरी चेंबर्स: हवेत धूळ मिसळू नये यासाठी आधुनिक फिल्टरेशन सिस्टीम आणि सेडिमेंटरी चेंबर्सचा वापर बंधनकारक करावा.
*सुरक्षित अंतर:* निवासी सोसायट्या आणि मानवी वस्तीपासून या प्लांटचे किमान सुरक्षित अंतर निश्चित करण्यात यावे.
*कडक दंडात्मक कारवाई:* नियम मोडणाऱ्या प्लांटचा परवाना थेट रद्द करावा किंवा त्यांना सील ठोकण्यात यावे.
वाहतूक नियमन: आरएमसी टँकर्ससाठी स्वतंत्र वेळा ठरवून रस्त्यावर सिमेंट सांडल्यास अवजड दंड आकारावा.
पारदर्शकतेसाठी जनसुनावणीची गरज
“प्रशासनाने बंद दाराआड नियमावली तयार न करता, स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सार्वजनिक जनसुनावणी घ्यावी,” अशी आग्रही मागणी महासंघाने केली आहे. यामुळे ‘लोकांचे आरोग्य’ केंद्रस्थानी ठेवून एक पर्यावरणपूरक धोरण तयार होईल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
आता या गंभीर विषयावर मुख्यमंत्री आणि महानगरपालिका प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्व पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
