पिंपरी-चिंचवड :
शहरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे नागरिकांची कमालीची त्रिधा तिरपीट उडाली. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शहरातील वृक्षसंपदेला बसला असून अनेक भागांत झाडे आणि फांद्या रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
भोसरीत दोन ठिकाणी वीज कोसळली, तर वाल्हेकर वाडीत कारचे नुकसान
पावसाचा जोर इतका तीव्र होता की भोसरी परिसरातील गव्हाणे पेट्रोल पंपाच्या जवळ आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस अशा दोन ठिकाणी वीज पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
नारळाच्या झाडाला आग: भोसरीतील गव्हाणे पेट्रोल पंपाच्या जवळील एका नारळाच्या झाडावर थेट वीज कोसळली. यामुळे झाडाने पेट घेतला आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते.
झाड दुभंगले: भोसरी पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या एका झाडावरही वीज पडल्याने ते झाड मधोमध दुभंगले.
कारवर पडले झाड: वाल्हेकरवाडी येथे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एका कारवर झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
विद्युत वाहिनी तुटली: रुपीनगर परिसरामध्ये उच्च दाबाची (हाय व्होल्टेज) विद्युत वाहिनीची तार थेट रस्त्यावर पडल्याची माहिती नागरिकांनी दिली, ज्यामुळे परिसरात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
अग्निशामक दलाची ‘ऑन फिल्ड’ धावपळ
शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात झाडपडीच्या घटनांचे कॉल्स येत होते. रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने कटरच्या साहाय्याने कापून बाजूला करण्यात आली. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ता वाहतुकीसाठी तात्काळ खुला करून देण्यात आल्याची माहिती अग्निशामक विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.
शहरभरातून आलेले झाडपडीचे प्रमुख ‘कंट्रोल रूम’ कॉल्स:
अग्निशामक दलाकडे खालील ११ मुख्य ठिकाणांवरून मदतीसाठी कॉल्स आले होते:
१. गोल्डन सोसायटी, बोराडे वस्ती (मोशी)
२. मारुती मंदिर, महादेव आळी (दापोडी)
३. वाय जंक्शन, मोशी – दुडूळगाव रस्ता (चोवीसा वाडी)
४. शिवतेज नगर, संभाजी नगर (सेक्टर १८)
५. अथर्व पार्क गार्डन, गुरुद्वारा जवळ (वाल्हेकर वाडी)
६. बौद्ध विहार, बर्ड व्हॅली जवळ
७. सेक्टर २६, बँक ऑफ बडोदा जवळ
८. एकता चौक (रुपी नगर)
९. आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर
१०. भोंडवे लॉन, मळेकर वस्ती (रावेत)
शहराबाहेरील घटनेची तत्परता: पिंपरी-चिंचवड हद्दीच्या बाहेर मारुंजी येथील रस्त्यावर’ देखील एक मोठे झाड पडल्याची माहिती मिळाली होती. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने तात्परता दाखवत ही माहिती तातडीने ‘पीएमआरडीए’च्या अग्निशामक विभागास कळवून पुढील कारवाई करण्यास मदत केली.
