पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – कामावर उशिरा आल्याबद्दल रागावल्याचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या केबिनमध्येच व्यवस्थापकावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास निघोजे येथे घडली आहे. या हल्ल्यात व्यवस्थापक गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
योगेश चंद्रकांत माने (रा. बेळगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. प्रविण ज्ञानेश्वर बोबडे (वय ३४, रा. घारे यांचे रूममध्ये, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. पिंपळखुटा, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ) असे खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यवस्थापकाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी याबाबत दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी दुपारी ११.२२ वाजेच्या सुमारास निघोजे (ता. खेड, जि. पुणे) गावाच्या हद्दीतील ‘संदिप टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ कंपनीत ही घटना घडली. आरोपी योगेश माने हा कंपनीत उशिरा आल्यामुळे फिर्यादी प्रविण बोबडे यांनी त्याला रागावले होते. याचा राग मनात धरून आरोपीने चिडून फिर्यादीच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्याने आपल्या हातातील हातोड्याने फिर्यादीच्या डोक्यावर पाठीमागील बाजूने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. आरोपीने फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.
कंपनी व्यवस्थापकावर हातोड्याने खुनी हल्ला; आरोपीला अटक
