​गहुंजेतील उच्चभ्रू सोसायटीत घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – गहुंजे येथील लोढा बेलमेडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत धमकी दिली. आरोपी फिर्यादी महिलेला शोधण्यासाठी आले होते. मात्र ती न मिळाल्याने तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास घडली.
​कुणाल कुमार (वय ३५), सुरभी सिन्हा (वय ३४), शांतनु शेखर (वय ३३) आणि श्वेताभ कुमार (वय २४, सर्व रा. बाणेर, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला फिर्यादीने रविवारी (दि. २४ मे) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्यरात्री लोढा बेलमेडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये जबरदस्तीने घुसले. फिर्यादी महिला घरी नसल्याचे लक्षात येताच आरोपी संतापले. आरोपी कुणाल कुमार याने फिर्यादीचे वडील रवींद्र चौबे यांच्या कानशिलात बुक्के मारले. तसेच अन्य आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *