शूज आणि टी-शर्टच्या रंगाने ‘गेम’ उलटवला! ६० सीसीटीव्ही तपासत पिंपरी पोलिसांनी ४८ तासांत माथेफिरू बाउन्सरला ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड :
चित्रपटात शोभावा असा थरार आणि तितकीच अचूक कामगिरी पिंपरी पोलिसांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे! संत मदर तेरेसा उड्डाणपुलावर एका तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका विकृत माथेफिरूला पिंपरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत गजाआड केले. स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलून हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पायातील शूज आणि टी-शर्टच्या एका रंगाने त्याचा सगळा ‘गेम’ उलटवला. पोलिसांनी ६० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळून या अत्यंत आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावला.
​झाकीर शेख (वय ४३, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या एका नामांकित मॉलमध्ये तो ‘बाउन्सर’ म्हणून काम करतो, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.

काय घडली होती घटना?
​काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरून जात असताना, या माथेफिरूने तिच्यासमोर अत्यंत लज्जास्पद आणि अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे ती तरुणी प्रचंड घाबरली. तिने तात्काळ पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. महिला सुरक्षेशी संबंधित विषय असल्याने पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले.

पुरावा नव्हता, पण पोलिसांनी ‘असा’ लावला छडा!
गुन्हा घडला त्या ठिकाणी पोलिसांकडे आरोपीचा कोणताही ठोस सुगावा किंवा चेहरा स्पष्ट नव्हता. त्यातच आरोपी अत्यंत शातिर निघाला; गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने स्वतःचे कपडे बदलले होते.
​पण म्हणतात ना, ‘गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही सुगावा सोडतोच!’ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील तब्बल ६० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारीक नजरेने तपासण्यास सुरुवात केली.

खाकीची नजर आणि तो ‘क्लू’…
वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासताना पोलिसांना एका संशयिताच्या टी-शर्टचा रंग आणि त्याच्या पायातील विशिष्ट शूज दिसून आले. कपडे बदलले तरी आरोपी शूज आणि टी-शर्टचा तो रंग बदलू शकला नव्हता. याच एका धाग्यावरून पोलिसांनी संशयिताचा माग काढायला सुरुवात केली.

वाल्हेकरवाडीतून अखेर बेड्या ठोकल्या!
​सीसीटीव्हीचे धागेदोरे जोडत जोडत पिंपरी पोलिसांचे पथक चिंचवडच्या वाल्हेकरवाडी येथील चिंचवडेनगर भागात पोहोचले. पोलिसांनी सापळा रचून संशयित झाकीर शेख याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच, मॉलमध्ये बाउन्सर असणाऱ्या या विकृताने आपले पाप कबूल केले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या ४८ तासांच्या आत आरोपीच्या हातात बेड्या ठोकून पिंपरी पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचा संदेश दिला आहे.

​”गुन्ह्यात कोणताही थेट पुरावा नसताना केवळ तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आम्ही आरोपीचा माग काढला. महिलांविरुद्ध असे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
– विजयानंद पाटील, पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *