आळंदी मंदिर सुरक्षा व्यवस्थेत मोठे फेरबदल कर्मचाऱ्यांसाठी ‘हा’ दरवाजा सक्तीचा, वाचा १५ नवे नियम काय?  

आळंदी:  आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या एका चोरीच्या  गैरप्रकारानंतर मंदिर संस्थान कमिटीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यापुढे मंदिरातील सुरक्षा व्यवस्था डिजिटल आणि हायटेक करण्यासाठी थेट ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (‘एआय’) तंत्रज्ञान,फेस आणि थम्ब आयडी यंत्रणा आणि ‘ईआरपी ‘ सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मंदिर संस्थांच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. परिषदेत प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, व्यवस्थापक माऊली वीर, तसेच पुरुषोत्तम महाराज लोंढे उपस्थित होते. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता . मंदिर प्रशासनाने विश्वासाने जबाबदारी दिलेल्या एका सेवेकऱ्यानेच दानपेटीतील रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. मंदिरात १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा प्रकार घडला आहे.यामध्ये मंदिराच्या कॅश विभागातून संशयास्पद हालचाली करणाऱ्या विशाल वारूळे या स्वयंसेवकाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडून आळंदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी २५ मे २०२६ रोजी आळंदी कार्यालयात विश्वस्त मंडळाची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी १५ कलमी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संस्थानच्या सीसीटीव्ही विभागातील कर्मचारी श्रीकांत संजय लवांदे हे फुटेज तपासत असताना, १२ मे, १३ मे आणि १६ मे २०२६ रोजी स्वयंसेवक विशाल वारूळे हा कॅश विभागातून इतरांची नजर चुकवून हार, फुले तसेच एक प्लास्टिकचे छोटे पोते स्वतःसोबत घेऊन जात असल्याचे आढळून आले. संस्थान कमिटीने आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके साहेब यांच्याशी संपर्क साधून वारुळे याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान मंदिरातील गैरप्रकारानंतर प्रशासनाने सुरक्षेसाठी अत्यंत आधुनिक पावले उचलली आहेत. त्यानुसार संपूर्ण मंदिर परिसरात ‘एआय’  तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून, कॅश विभागात केवळ अधिकृत व्यक्तींनाच  फेस आणि थम्ब बायोमेट्रिक द्वारे प्रवेश दिला जाईल. प्रशासकीय पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक ‘ईआरपी ‘  सॉफ्टवेअर आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे ‘जिओ ट्रॅकिंग’ हजेरी सुरू करण्यात येत आहे. याशिवाय, सर्व कर्मचाऱ्यांना रोज व्हॉट्सॲप ग्रुपवर स्वतःचे लोकेशन आणि फोटोसह लॉग-इन व लॉग-आऊट करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

नव्या नियमांनुसार अन्नदान व कॅश मोजणीच्या ठिकाणी स्वयंसेवकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र आणि केवळ ‘हनुमान दरवाजा’तूनच ये-जा करणे बंधनकारक केले आहे. कर्मचाऱ्यांना सोबत पिशव्या आणण्यास मनाई असून, त्यांची नियमित कसून तपासणी आणि दानपेटी मोजणीनंतर अंगझडती घेतली जाईल. या व्यवस्थेवर रोज किमान एक विश्वस्त थेट देखरेख ठेवणार असून, कर्मचाऱ्यांची निष्ठा वाढावी म्हणून गतवर्षीच वेतनवाढही करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा आढावा घेत व्यवस्थापनाने कॅश विभाग, प्रशासन आणि अन्नदान प्रमुखांकडून सविस्तर खुलासा मागवला असून, आळंदी पोलिसांच्या तपासाचा सतत पाठपुरावा सुरू आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *