Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे :
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे धरणातून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर खडकवासला धरणही ९५ टक्के भरल्याने पुढील काही तासांत सांडव्यातून पाणी सोडण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील वडीवळे धरण ९८.९४ टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज (२३ जुलै) सायंकाळी ६ वाजल्यापासून सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे नदीपात्रात सुरू असलेला २,४५४ क्युसेक विसर्ग वाढवून ५,७७३ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यास विसर्गात परिस्थितीनुसार आणखी बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी दिली.

दरम्यान, खडकवासला धरण जलाशयही ९५ टक्के क्षमतेने भरला असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याचा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाने दिला आहे.

पाटबंधारे विभागाने नागरिकांना नदी, नाले आणि नदीपात्रात प्रवेश करू नये, तसेच नदीपात्रातील वाहने, साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांना त्वरित सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत.

पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधील विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *