पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएतील घरवाटपाला ब्रेक; सुधारित तारीख लवकरच जाहीर होणार
पुणे –
हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या हजारो अर्जदारांना ऐनवेळी प्रतीक्षेचा आणखी धक्का बसला आहे. पुणे मंडळामार्फत २८ मे रोजी होणारी सदनिका वितरण प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील रिक्त सदनिकांचे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार होते. या प्रक्रियेसाठी अनेक अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता करून तयारी पूर्ण केली होती. मात्र, आचारसंहितेमुळे शासकीय स्तरावरील वितरण प्रक्रिया थांबवावी लागल्याने म्हाडाने कार्यक्रम पुढे ढकलला.
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून २८ मे रोजी दुपारी २.३० वाजता सदनिका वितरणाची अंतिम प्रक्रिया पार पडणार होती. या अंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए हद्दीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील विक्रीअभावी रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, मध्यमवर्गीय आणि नोकरदार कुटुंबांसाठी या घरांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. अनेकांनी बँक कर्ज प्रक्रिया आणि आर्थिक नियोजनही सुरू केले होते. त्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलल्याने अर्जदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मात्र, म्हाडा प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत ही प्रक्रिया रद्द झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर किंवा निवडणूक आयोगाच्या पुढील निर्देशानुसार सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
अर्जदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे मंडळाकडून नवीन तारखा आणि पुढील प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
