पिंपरी-चिंचवडकरांचा डिजिटल करभरणेला जोरदार प्रतिसाद; अवघ्या ५६ दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत २३० कोटी!

दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी भरला मालमत्ता कर; ऑनलाइन व्यवहारांना नागरिकांची पसंती

​पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवडकरांनी यंदा मालमत्ता कर भरण्यात ‘डिजिटल स्मार्टनेस’ दाखवत महापालिकेच्या महसुलात मोठी भर घातली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अवघ्या ५६ दिवसांत तब्बल २३० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरत सवलतीचाही लाभ घेतला आहे.

​महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने १ एप्रिल ते २६ मे २०२६ या कालावधीत ही विक्रमी वसुली केली आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ३२ हजार ३८५ मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. यामधून महापालिकेच्या तिजोरीत २३० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे.

​यंदा ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र दिसून आले. तब्बल २ लाख ८ हजार ५७० नागरिकांनी डिजिटल माध्यमातून कर भरला. या माध्यमातूनच २१२ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पालिकेच्या कार्यालयात रांगा टाळत नागरिकांनी घरबसल्या कर भरण्यास पसंती दिली.

​महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक, पर्यावरणपूरक गृहनिर्माण संस्था तसेच ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी विशेष सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

​पिंपरी-चिंचवड शहरात सध्या निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद आहे. या सर्व मिळकतधारकांना देयके उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
​महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या प्रतिसादाचे कौतुक केले. “मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य आर्थिक आधार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांसाठी नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

​उपायुक्त सचिन पवार यांनी नागरिकांना ३० जूनपूर्वी कर भरण्याचे आवाहन केले आहे. “ऑनलाइन माध्यमातून कर भरल्यास वेळ, श्रम आणि गर्दी टाळता येते. तसेच सवलतींचाही लाभ मिळतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

​महापालिकेने उर्वरित मालमत्ताधारकांना लवकरात लवकर कर भरून दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *