​रक्षक चौक भुयारी मार्ग अंतिम टप्प्यात; वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू

​कोंडीमुक्त प्रवासासाठी महापालिकेची तयारी; वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन

​पिंपरी-चिंचवड :
सांगवी फाटा ते किवळे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा रक्षक चौक येथील भुयारी मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. काम पूर्णत्वाकडे जात असल्याने सध्या या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

​महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मार्गाचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांवर आधुनिक सुरक्षा सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

​संपूर्ण भुयारी मार्गावर ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उताराच्या भागात ओव्हरटेकिंगला बंदी असेल. पादचारी, सायकलस्वार आणि संथगती वाहनांसाठी स्वतंत्र सेवा रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बीआरटी मार्गिका फक्त बससेवेसाठी राखीव ठेवण्यात आली असून त्यामध्ये खाजगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

​अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे ब्लिंकर्स, रंबल स्ट्रिप्स आणि प्रकाश परावर्तक बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
​मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी हा मार्ग शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *