मंचर परिसरात शोककळा; शासकीय कर्तव्य बजावताना काळाने घातला घाला
मावळ –
जनगणनेच्या शासकीय कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका शिक्षिकेचा भरधाव कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली. या भीषण अपघातात शिक्षिका दीपाली सुजित तांबे (रा. मंचर) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मंचर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे या मंचर येथील रहिवासी असून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या सुरू असलेल्या जनगणना संदर्भातील शासकीय कामासाठी त्या घरातून निघाल्या होत्या. कान्हे फाटा परिसरात आल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
अपघाताचा जोर इतका भीषण होता की, दीपाली तांबे यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शासकीय कर्तव्य बजावत असताना एका शिक्षिकेचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे मंचर परिसरातील शैक्षणिक वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
