फुगेवाडी विषारी दारूकांडाची धास्ती कायम!

दोन रुग्ण मृत्यूशी झुंज सुरुच, आरोग्य यंत्रणा सतर्क, बाधितांची संख्या दहावर

वायसीएममधील दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर, नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा

पिंपरी-चिंचवड :
फुगेवाडीतील विषारी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड शहरात चिंता कायम असून उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे गेल्या २४ तासांत नव्याने एकही रुग्ण आढळून न आल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणातील बाधितांची संख्या सध्या दहावर पोहोचली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय यंत्रणेची धावपळ वाढली आहे.

वायसीएम रुग्णालयात दाखल असलेले श्रीमंत कोळी (वय ६०) आणि प्रफुल्ल अरिकस्वामी (वय २७) यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तर त्याच रुग्णालयातील प्रकाश राठोड (वय ६५), जितू शेदातपुरी (वय ३१) आणि सोनू तायडे (वय ३०) यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

फुगेवाडी प्रकरणातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांतही दाखल करण्यात आले आहे. औंध जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले चंदन कुमार (वय २६), खाजप्पा शिंगे (वय ३५) आणि पवन चव्हाण (वय ३५) यांची प्रकृती सुधारत असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

याशिवाय अस्लम खान (वय ४०) यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सुभाष डिग्गीकर (वय ६६) यांच्यावर औंध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेनंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. फुगेवाडी आणि परिसरात विशेष पाहणी सुरू आहे. संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. मात्र सध्या कोणताही नवीन बाधित आढळून न आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

विषारी दारूकांडानंतर फुगेवाडी परिसरात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण कायम आहे. गंभीर रुग्णांच्या प्रकृतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *