भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; तरुणाचा मृत्यू

दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना रविवारी (३१ मे) मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मनोहर पर्रीकर अंडरपास, सुदर्शन चौक, नवी सांगवी येथील मुख्य रस्त्यावर घडली.

अमन आयाज शेख (२२, वल्लभनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात प्रज्वल प्रशांत शिंदे (२२, धानोरी, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकी चालक आकाश रंजन कदम (२४, पिंपरी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागील सीटवर बसलेला फिर्यादीचा मित्र अमन शेख हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातात आरोपी स्वतः देखील गंभीर जखमी झाला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *