मोबाईलच्या पडद्याने गिळंकृत केली सुट्टी; मैदानांऐवजी ‘रील्स’मध्ये रमली शहरातील पिढी

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदाने ओस पडली; स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांची चिंता

पिंपरी-चिंचवड – उन्हाळी सुट्टी म्हटली की क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, कबड्डी आणि मित्रांसोबतचा धिंगाणा हे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वत्र पाहायला मिळत होते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात यंदा वेगळेच वास्तव समोर आले आहे. मैदानांवर धावणारी पावले आता मोबाईलच्या पडद्यावर थांबली आहेत. ‘रील्स’ आणि सोशल मीडियाच्या आकर्षणाने बालकांसह तरुणाईला अक्षरशः वेढले असून उन्हाळी सुट्ट्यांमध्येही अनेक मुले घरातच मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये हायस्पीड इंटरनेटचे जाळे सर्वदूर पोहोचले आहे. जवळपास प्रत्येक घरात स्मार्टफोन उपलब्ध आहे. माहिती, शिक्षण आणि संवादासाठी उपयुक्त ठरणारे इंटरनेट आता मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे साधन बनले आहे. विशेषतः इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबसारख्या माध्यमांवरील लघु व्हिडिओंचे आकर्षण तरुणांमध्ये झपाट्याने वाढले आहे.

सुट्टीच्या काळात मैदानी खेळांपेक्षा ‘रील्स’ तयार करण्याकडे तरुणांचा अधिक कल दिसून येत आहे. घर, बाग, रस्ते, मॉल किंवा सार्वजनिक ठिकाणी मोबाईलसमोर अभिनय, नृत्य किंवा हावभाव करत व्हिडिओ तयार करणारे युवक-युवती सहज दिसतात. काही सेकंदांच्या व्हिडिओमधून प्रसिद्धी मिळविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.
सोशल मीडियामुळे अनेकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत आहे. नृत्य, गायन, अभिनय, पाककला आणि विविध कलाक्षेत्रांतील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र, या आभासी जगाच्या मोहात मैदानी खेळ, शारीरिक हालचाल आणि सामाजिक संवाद कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड आणि परिसरातील अनेक मैदाने संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुलनेने ओस पडू लागली आहेत. दुसरीकडे मोबाईलवरील स्क्रीन टाईम वाढत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, स्क्रीनसमोर दीर्घकाळ घालविल्याने डोळ्यांवर ताण येणे, शारीरिक हालचाली कमी होणे, एकाग्रतेवर परिणाम होणे आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक असला तरी सुट्टीचा काही वेळ मैदानी खेळ, व्यायाम आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादासाठी देण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *