ठार मारण्यासाठी कोयत्याने वार; ठार झाल्याचे समजून निर्जनस्थळी फेकले व्हाट्सॲपवरून जीवे मारण्याची ऑर्डर

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – एका व्यक्तीने आपल्या आठ ते नऊ साथीदारांना व्हाट्सॲप कॉल करून आळंदी येथे फेब्रिकेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीला ठार मारण्याची ऑर्डर दिली. त्यानंतर साथीदारांनी व्यावसायिकावर कोयत्याने वार करत बेदम मारहाण केली. त्यानंतर व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी व्यावसायिकाला चऱ्होली खुर्द येथील वडगाव रोडवर निर्जन ठिकाणी फेकून दिले. ही घटना मंगळवारी (दि.२ जून) रोजी रात्री घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
करण सोळंके, माउली निरस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह प्रेम जाधव, सोन्या जाधव, खंडू लोणकर आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम हुसेन शेख (वय ३३, रा. आळंदी) यांनी बुधवारी (दि. ३ जून) रोजी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या मातिीनुसार, खंडू लोणकर याने इतर आरोपींना व्हाट्सॲप कॉल करून वसीम यांना ठार मारण्याची ऑर्डर दिली होती. आरोपींनी वसीम यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. खंडू लोणकर याने वसीम यांना ठार मारण्याबाबत व्हाट्सॲप कॉलवरून सांगितले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. वसीम यांचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी त्यांना गाडीत घालून वडगाव रोड, चऱ्होली खुर्द येथे एका मोकळ्या जागेत गाडीतून फेकून दिले. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *