पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किवळे येथे सुरु असलेल्या एका शाळेच्या बांधकाम साईटवर सुरक्षा साधने न पुरवल्याने एका कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३ जून) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
सनी शेख असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अजमात नजरुल खान (वय २२, रा. पुनावळे. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी बुधवारी (दि. ३ जून) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दूधनाथ महतो (वय २१), सय्यद रफिकुल हुसेन अली (वय ३२), सागर विनोद सावंत (वय ५०), प्रशांत खोजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथे सीएमएस स्कुल या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सनी शेख हा कामगार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सेफ्टी नेट बांधण्याचे काम करत होता. त्यावेळी आरोपींनी त्याला सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, जॅकेट, रस्सी, शिडी अशी कोणतीही सुरक्षा साधने दिली नाही. सुरक्षा साधनांशिवाय काम करत असल्याने सनी हा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याला मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राहुल महतो, सय्यद अली, सागर सावंत या तिघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
बांधकाम साईटवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
