थेरगाव मध्ये ८.३७ लाखांचा गुटखा जप्त

थेरगाव येथील आनंदवन सोसायटीच्या तळमजल्यावर साठवून ठेवलेला आठ लाख ३७ हजार १०९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी (८ जून) दुपारी केली. यामध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूम मालक किशोर लहू लोंढे (३२, थेरगाव), अमोल लहू लोंढे (३६, थेरगाव), भाडेकरू राजेंद्र किसन टेकाळे, रुस्तम खान, बाबर खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किशोर लोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आफनान अब्दुल कादिर शेख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला होता. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाई मध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधी पानमसाला असा एकूण आठ लाख ३७ हजार १०९ रुपयांचा गुटखा जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

इमारतीच्या खोलीतून ४० हजारांचा गुटखा जप्त

चाकण येथील महात्मा फुले चौक ते आंबेठाण चौक दरम्यान एका इमारतीच्या खोलीत बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात विमल पान मसाला, सम्राट पान मसाला, राजनिवास सुगंधीत पान मसाला आणि तंबाखू असा एकूण ३९ हजार ७०२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (८ जून) रात्री ११ वाजताच्या सुमारास नवनाथ गोरे यांच्या इमारतीच्या तळमजल्यावरील रूममध्ये करण्यात आली. नवनाथ ज्ञानोबा गोरे (५१, आंबेठाण रोड, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल भैरोबा यादव यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *