घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केली चोरी
पिंपरी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील बंद घरातून घरकाम करणाऱ्या मोलकरणीने मालकाची नजर चुकवून सव्वातीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना २२ फेब्रुवारी ते ९ जून या कालावधीत पिंपरी येथील कोहिनूर वायोना हौसिंग सोसायटीत घडली.
या प्रकरणात शिल्पा दीपक हटूंगडी (५०, पिंपरी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरकाम करणारी मोलकरीण गंगा उर्फ अंजली नाईक (४०, गांधीनगर, पिंपरी) हिच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिक्षक असून आरोपी गंगा ही त्यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करत होती. गंगा हिने घरातील ३ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. ९ जून रोजी फिर्यादी हट्टंगडी यांनी घरातील दागिन्यांची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.