एल-निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाचा कठोर आदेश; बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
पिंपरी-चिंचवड :
यंदाच्या मान्सूनबाबत हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणांमधून सिंचनासाठी दिले जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने जारी केले आहेत. पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या आदेशानुसार धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त पथके तयार केली जाणार आहेत. अनधिकृत पंप, मोटारी आणि पाईपलाईनद्वारे पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केले जाणार आहे. गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्याने ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, या दृष्टीने स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
पाणी संवर्धन आणि वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला दर आठवड्याला अहवाल सादर करावा लागणार आहे. परिस्थितीवर मंत्रालय स्तरावर थेट लक्ष ठेवले जाणार आहे.
“कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू नये. सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहून काटेकोर नियोजन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी स्पष्ट केले आहे.
एल-निनोच्या संभाव्य परिणामांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असले, तरी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काही महिने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
