पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – ऑटोरिक्षामधून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई चिंचवड येथील लिंक रोडवर रविवारी (दि. १४ जून) रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार सुनील सुरेश बाचकर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल रमेश कुरबेट (वय ३३, रा. धिरज गॅलेक्सी अपार्टमेंट, चिंचवडगाव) या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या ताब्यातील प्रवासी रिक्षा (एमएच १४ एलएस ७१२२) मधून विनापरवाना एक हजार ८८० रुपये किमतीचा प्रोव्हिबिशन माल विक्रीसाठी घेऊन जात असताना ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल समोर रंगेहात सापडला. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
रिक्षामधून दारूची वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई
