डॉक्टर-रुग्ण विश्वासाला तडा; उपचारासाठी दाखल महिलेसोबत गैरवर्तनाचा आरोप चिंचवडमधील डॉक्टरला निगडी पोलिसांकडून अटक

पिंपरी-चिंचवड ः
उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी निगडी पोलीसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
निगडी पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३७ वर्षीय महिला उपचारासाठी संभाजीनगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्यावर महिला वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरील डॉक्टर वॉर्डमध्ये आले. त्यानंतर महिलेसोबत गैरवर्तन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
डॉ. धैर्यशील शेटक (वय २७, रा. संभाजीनगर, चिंचवड, मूळ रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. गैरवर्तनाबाबत संबंधित महिलेने तातडीने आपल्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.

रुग्णालयातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्न
या घटनेनंतर खासगी रुग्णालयांमधील महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रात्रीच्या वेळेत महिला वॉर्डमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना कितपत प्रभावी आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाचे नाते अबाधित राहणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, रुग्णालयांमध्ये महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *