रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; ‘पक्षफोडीचे राजकारण सुरू राहिले तर जनता रस्त्यावर उतरेल’

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतरांच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना अशा विविध पक्षांमध्ये होत असलेल्या कथित फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करत त्यांनी लोकशाहीच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

“शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत,” असे परखड वक्तव्य रोहित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो, अशा चर्चा सुरू असतानाच रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकशाही व्यवस्थेत मतदार एखाद्या पक्षाच्या विचारसरणीवर, नेतृत्वावर आणि जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून मतदान करतात. मात्र निवडून आल्यानंतर पक्षांतर करणे म्हणजे मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

वारंवार होणाऱ्या राजकीय फोडाफोडीमुळे लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होत असून सत्तेसाठी सुरू असलेले हे राजकारण थांबले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत रोहित पवार यांच्या वक्तव्याने राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *