पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एमआयडीसी भोसरी येथील एक व्यावसायिक इमारत आणि भूखंड ५ कोटी रुपयांना देण्याचे ठरवून २ कोटी ४५ लाख रुपये घेतल्यानंतर, तोच भूखंड दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे १५ जुलै २०२२ ते १२ जून २०२६ या कालावधीत घडली.
हरबनसिंग जब्बल (वय ७७) आणि जसविंदर कौर हरबनसिंग जब्बल (वय ७४, दोघेही रा. सिमरन बंगला, निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. छाया मधुकर कोकरे (वय ५०, रा. हनुमाननगर, भगत वस्ती, भोसरी, पुणे) यांनी मंगळवारी (दि. १६ जून) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची एमआयडीसी भोसरी येथील मिळकत फिर्यादी यांना ५ कोटींना विकण्याचे ठरवून विसार पावती केली होती. त्यापोटी दोन कोटी ४५ लाख रुपये घेतले असताना आरोपींनी ही जागा दुसऱ्याला विकण्याची जाहीर नोटीस दिली. त्यानंतर पुन्हा ६ कोटींना व्यवहार ठरवून खरेदी दस्त करण्यात आला व फिर्यादीने २,९५,०५,०००/- रुपये दिले. मात्र, आरोपींनी दस्त अस्तित्वात येऊ नये म्हणून खोट्या तक्रारी केल्या, बँक खाते बंद केले आणि खरेदीखतास विचारणा केली असता दमदाटी व शिवीगाळ केली. याप्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.
जागेच्या व्यवहारात फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
