कोल्हापूर
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टीका केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना मौन का बाळगले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील म्हणाले, “मला या भाजपच्या आणि आरएसएसच्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? आज शेतकऱ्यांची जमीन जाताना ते हिंदू नाहीत का? का त्यांना तुम्ही हिंदू मानत नाही? निवडणुकीत तुम्हाला हिंदू आठवतो, पण शक्तीपीठमध्ये जमीन जाताना हिंदू समाजाची आठवण होत नाही.”
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थांकडून विरोध सुरू असताना सतेज पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात असताना सरकारने त्यांच्या भावना आणि उपजीविकेचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करते, मात्र प्रत्यक्षात हिंदू शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारने संवाद साधण्याऐवजी प्रकल्प पुढे रेटण्याची भूमिका घेतल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, सतेज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून या टीकेला काय उत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
