चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरातील जिजामाता चौकात कारच्या कट मारण्यावरून आणि गाडी रस्त्यात थांबवण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या क्षुल्लक वादाचे रूपांतर थेट पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये झाले. यात तब्बल १५ तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मारहाणीच्या या प्रकारामुळे भविष्यात पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १२ हून अधिक विद्यार्थ्यांचे करिअर आता पूर्णपणे धोक्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या वादावरून शरद सुभाष भोसले (वय ३५, रा. वाल्हेकरवाडी) आणि गणेश राजू शिंदे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी) यांच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये प्रवीण बडे (वय २४), सागर अनिल गावडे (वय २६), हितेश सुधीर चौधरी (वय २२), तेजस हगवणे (वय २०) आणि स्वराज पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील इतर १० ते १२ अनोळखी मुलांचा समावेश आहे.
भविष्य अंधारात; पोलीस भरतीची दारे बंद
हाणामारीत अडकलेले बहुतांश तरुण हे २२ ते २६ वयोगटातील आहेत. यातील १२ हून अधिक मुले ही अत्यंत गरिबीतून आणि कष्टाने पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून चिंचवडमध्ये प्रशिक्षणासाठी आली होती. मात्र, क्षणाच्या रागावर ताबा न ठेवल्यामुळे आता त्यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंद झाले आहेत. शासकीय नियमांनुसार, फौजदारी गुन्हा दाखल असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नाही.
कॅरेक्टर सर्टिफिकेटवर ‘डाग’ अन पासपोर्टची दारेही बंद
या गुन्ह्यांमुळे या तरुणांना केवळ सरकारी नोकरीच नव्हे, तर खासगी क्षेत्रात आणि परदेशात जाण्याच्या संधींनाही मुकावे लागणार आहे. कोणत्याही खासगी कंपनीत नोकरीला लागताना ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र’ (Character Certificate) अनिवार्य असते. आता गुन्ह्याची नोंद रेकॉर्डवर आल्यामुळे त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर हा डाग कायम राहणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, न्यायालयात गुन्हा प्रलंबित किंवा दाखल असल्यामुळे नियमांनुसार आता या तरुणांना पासपोर्ट देखील मिळणार नाही, ज्यामुळे त्यांचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे मार्गही बंद झाले आहेत.
कोर्ट-कचेरीचा भुर्दंड
ज्या वयात हाताला काम मिळून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे गरजेचे होते, त्या वयात आता या मुलांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही आता जमीन आणि सुटकेसाठी हजारो रुपये खर्च करून वकील करावा लागणार आहे. केवळ एका क्षणाच्या रागाने आवेशात येऊन केलेल्या कृत्यामुळे या तरुण मुलांचे आयुष्य जवळपास उद्ध्वस्त झाले असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आता चिंतेचे सावट पसरले आहे.
या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास चिंचवड पोलीस ठाणे करीत आहे.
