लोणावळा, १८ जून : वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाय घसरून किल्ल्यावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अग्रवाल (वय २४) हा आपल्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवसानिमित्त लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. किल्ल्यावर फिरत असताना ओलसर व निसरड्या पृष्ठभागामुळे त्याचा तोल जाऊन तो खोल दरीत पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. केतन याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
केतन अग्रवाल हा पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीचा रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
