Pimpri-Chinchwad-​’ओल्या कचऱ्याची जबरदस्ती चालणार नाही’; थेट आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा सोसायट्यांचा इशारा!

पिंपरी-चिंचवड :
“१०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी” या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिपत्रकाला ‘चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ने तीव्र विरोध केला आहे. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत फेडरेशनने हा निर्णय अन्यायकारक व अव्यवहार्य असल्याचे सांगत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच, तोडगा न काढता सक्ती केल्यास थेट आयुक्तांच्या दालनात कचरा टाकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

​बिल्डरांवर कारवाई करण्याची मागणी
​बैठकीत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे आणि प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त जंगम यांच्यासमोर सोसायट्यांच्या अडचणी मांडल्या. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ही यंत्रणा उभारणे बांधकाम व्यावसायिकांची (बिल्डर्स) जबाबदारी होती. मग ही व्यवस्था नसताना बिल्डरांना पूर्णत्व प्रमाणपत्रे (OC) कशी मिळाली, असा सवाल करत आधी दोषी बिल्डरांवर कारवाई करा, अशी मागणी फेडरेशनने केली. जागेचा अभाव, दुर्गंधी आणि वाढता आर्थिक भार यामुळे सोसायट्यांवर हा निर्णय लादू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. इंदूरच्या धर्तीवर महापालिकेनेच कचरा संकलन व प्रक्रिया करावी, असेही सदस्यांनी सुचवले.

​”अडचणी सोडवण्याऐवजी जर महापालिकेने सोसायट्यांचा ओला कचरा उचलणे बंद केले, तर तोच कचरा आयुक्तांच्या दालनात टाकला जाईल.”
— संजीवन सांगळे (अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन)

​प्रशासनाने यावर नरमाईची भूमिका घेत लवकरच सर्व बाबींचा सखोल विचार करून तज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *