Mumbai-संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई(mumbai) : देशातील सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने राबविण्यात येणाऱ्या संसदीय संकुल विकास परियोजनेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून, या परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रातील परियोजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जनजातीय व दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल उपक्रम प्रभावी ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना तसेच शेती, सिंचन, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजनांचा लाभ या भागांतील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात यावेत.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील १० ते २० गावांचा समूह तयार करून विकास आराखडा राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. महिलांचे सक्षमीकरण, दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी वृक्षलागवड, जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच युवकांसाठी बाजारपेठ व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस डॉ. भारती पवार, डॉ. हेमंत सावरा, हिना गावीत, श्रीकर परदेशी, विजय वाघमारे, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, गिरीश देगावकर, डॉ. गजानन डांगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *