पुणे(pune)-इतिहासातील क्रांतिकारक व्यक्तिमत्त्वांवर आधारित ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रोमोमध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक विचारांची झलक दाखवण्यात आली असून, सामाजिक परिवर्तनाची क्रांतीज्योत पुन्हा एकदा पेटणार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या मालिकेची अधिकृत घोषणा केली असून ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या युट्युब चॅनलवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनप्रवासासोबतच समाजसुधारणेचा प्रवासही प्रभावीपणे मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून मालिकेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या मालिकेत सामाजिक समता, शिक्षणाचा अधिकार आणि स्त्री सक्षमीकरण या विषयांवर विशेष भर देण्यात येणार असून, ऐतिहासिक संदर्भांसह कथानक सादर केले जाणार आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
