पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला वाकड परिसरात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विकताना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास श्री साई इंग्लिश स्कूलच्या मागच्या मोकळ्या मैदानात करण्यात आली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार संदीप गवारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निसार अकबर मुजावर (२६, गुजर नगर, थेरगाव, मूळ- तुळजापूर, धाराशिव) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निसार मुजावर हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो स्कूलच्या पाठीमागील मैदानामध्ये ३८ हजार रुपये किमतीचे ७.६० ग्रॅम वजनाचे पांढरट रंगाचे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विकण्यासाठी घेऊन आला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले आणि त्याच्याकडून अंमली पदार्थांसह प्लॅस्टिक पिशव्या, एक मोबाईल आणि मोपेड दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
वाकडमध्ये फूड डिलिव्हरी बॉय दीड लाखांच्या एमडी ड्रग्ससह गजाआड
