Mumbai-अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण अनिवार्य; १५ ऑगस्टनंतर प्रमाणपत्र नसल्यास कारवाई

मुंबई(mumbai) : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी चार तासांचा ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

परिवहन विभागाच्या निर्देशानुसार, १५ ऑगस्टनंतर मराठी भाषा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित चालकांनी निर्धारित कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक ठरणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांची अधिकृत तज्ज्ञ संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच संस्थांमार्फत चालकांना मोफत मराठी भाषा प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या प्रमाणपत्रालाच परिवहन विभागाकडून मान्यता दिली जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात या मोहिमेअंतर्गत सुमारे ७१ प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रशिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुमारे साडेचार हजार शिक्षक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. तसेच विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे (RTO) अधिकारीही चालकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहेत.

या उपक्रमामुळे अमराठी चालकांना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करता येणार असून प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन सहआयुक्त रवी गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *