पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – चिखली परिसरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैशावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांच्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास रामदासनगर येथे करण्यात आली.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सूरज सुतार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश रामदास यादव (६०, रामदासनगर, चिखली), कांतारीलाल विठ्ठल तापकीर (६५, महादेवनगर, चिखली), विश्वनाथ भाऊसाहेब निसाले (५२, चिखली गावठण), रवींद्र जयसिंग पानसरे (५०, पाटीलनगर, चिखली), संतोष मारुती जाधव (४२, रामदासनगर, चिखली), सुनील सुरेश सोळंकी (३५, चिखली गावठण) आणि सतीश उत्तम ढेंबरे (४५, पाटीलनगर, चिखली) या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी विनापरवाना व बेकायदेशीररित्या पैशांची देवाणघेवाण करून जुगार खेळत बसले होते. पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकून जुगाराचे पत्ते आणि रोख रक्कम असा एकूण ४ हजार ८६० रुपयांचा माल जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
चिखलीत पत्त्यांचा जुगार खेळणारे ७ जण ताब्यात
