Delhi-मान्सूनपूर्व डेंग्यू-मलेरियाविरोधातील तयारीचा आढावा; केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी देशातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि आरोग्य संस्थांना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक बळकट करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रतिबंध, देखरेख, तपासणी आणि उपचारांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर देण्यात आला. संभाव्य रुग्णांची लवकर ओळख, वेळेवर निदान आणि तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना रुग्णालयांमधील आवश्यक औषधसाठा, तपासणी सुविधा, बेड्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

डासजन्य आजारांपासून बचावासाठी जनजागृती मोहिमांना गती देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि स्वच्छता राखणे याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

मान्सून काळात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक तयारी पूर्ण ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *