Mumbai-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात योग प्रात्यक्षिके; ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ अन्वी झांझरूकियाने जिंकली मने

मुंबई : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात विशेष योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित आणि ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखली जाणारी दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझरूकिया हिने आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

योगसाधनेच्या माध्यमातून दिव्यांगत्व ही मर्यादा नसून जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे अन्वीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. दिव्यांगत्वावर मात करत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य ती करत आहे. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात योगा इन्स्टिट्यूटचे समीर व्यास यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खुर्ची योगाचे (Chair Yoga) प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. नियमित योगाभ्यासातून निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह मंत्रालयातील विविध अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, नुकत्याच चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धा २०२५-२६ मधील महाराष्ट्राच्या विजेत्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. ४० ते ५० वर्षे वयोगटात शुभांगी चिकटे यांनी प्रथम क्रमांक, ४० वर्षांखालील गटात श्रीकांत घोलकर यांनी द्वितीय क्रमांक, तर ५० वर्षांवरील गटात दत्तात्राम सावंत आणि जगन्नाथ लांडगे यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांनी मंत्रालयात योगाची प्रात्यक्षिके सादर केली. अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *